fbpx

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत फडणवीसांचे सूचक वक्तव्य, म्हणाले…

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करून भाजपवासी होणार असल्याची चर्चा आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे. news 18 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य केले.

यावेळी फडणवीस म्हणाले की, मला नारायण राणेंनी पुस्तक प्रकाशनाला बोलावलं होतं. पण त्यांनी सांगितलेल्या वेळेत मला जाणं शक्य झालं नाही. राणे आमच्यासोबतच आहेत. राणेंनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय त्यांच्याशी चर्चा करुन घेतला आहे. नारायण राणेंना आपला पक्ष भाजपात विलीन करायचा आहे, असा खुलासाही त्यांनी केला. फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राणेंचा भाजप प्रवेश निश्चित असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान खासदार नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर राज्यात नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली. राणे भाजपमध्ये जातील अशीही चर्चा सुरू झाली होती. असं झालं तर महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचं काय होणार याबाबत तर्क लढवले जात होते.