औरंगाबादच्या क्वॉरंटाइन सेंटरमध्ये तब्बल 1 कोटींची चोरी!

aurangabad manapa

औरंगाबाद – कोरोनाच्या काळात महापालिकेने रुग्णांच्या उपचारासाठी १८ पेक्षा अधिक क्वॉरंटाइन व कोविड सेंटर उघडले होते.याठिकाणी आवश्यक ते सर्व साहित्य पुरवण्यात आले होते. मात्र, आता या साहित्याची हेराफेरी झाल्याचे  समोर आल्याने पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. या सेंटरमध्ये नागरिकांसाठी पुरविलेले१ कोटी रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचे समोर आल्याने पालिकेने आता त्याची तपासणी सुरू केली आहे.

२०२० मध्ये १५ मार्चनंतर औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाने पाय पसरवण्यास सुरूवात केली. त्यावर पालिकेने स्वतःच्या मालकीच्या इमारतींमध्ये, विविध शासकीय कार्यालय, खाजगी संस्थेच्या इमारतींमध्ये क्वॉरंटाइन सेंटर सुरू केले होते. येथे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना १४ दिवस राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आरोग्य विभागामार्फत दर्जेदार सेवा पुरविण्यात आल्या.

सेंटरमध्ये आलेल्या रुग्णांसाठी पालिकेच्या स्टोअर विभागाकडून ४ हजार गाद्या, ४ हजार उशा, ४ हजार किट ज्यामध्ये साबण, टूथ ब्रश, कंगवा, तेल आदी साहित्य होते. १७०० बकेट, मग, ८ हजार पिलो कव्हर, ८ हजार बेडशीट, माइक सिस्टीम, रेडिओ , टीव्ही , फ्रिज, संगणक, पल्स ऑक्सीमीटर, थर्मलगन, ऑक्सीमीटर असे विविध साहित्य पुरवण्यात आले होते. सध्या रुग्ण नसल्याने अनेक सेंटर बंद आहेत. त्यानंतर सबंधित साहित्य पालिकेकडे परत जमा होणे आवश्यक होते. मात्र आतापर्यंत एकही साहित्य पालिकेकडे जमा झालेले नाही. यातील ९० टक्के साहित्य चोरीला गेले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचे सामानही चोरीला
देवगिरी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्येही कोरोना रुग्णांना राहण्याची व्यवस्था पालिकेने केली होती. या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे काही साहित्य कपाटामध्ये बंद केलेले होते. मात्र या कपाटातील सर्व साहित्य चोरीला गेल्याचेही समोर आले आहे.

साहित्याची तपासणी करणार : शहर अभियंता
प्रशासनाने कोरोना रुग्णांसाठी दिलेले साहित्य गेले कोठे? याची तपासणी केली जाणार आहे. स्टोअर आणि आरोग्य विभागाची ही जबाबदारी आहे. दिलेले साहित्य परत पालिका मुख्यालयात जमा होणे आवश्यक आहे, असे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

समाज कल्याणमधून ८६ फॅन गायब
किलेअर्क येथे समाज कल्याण विभागाची जुनी इमारत आहे. पालिकेने ती ताब्यात घेतली होती. येथील जवळपास ८६ सिलिंग फॅन देखील गायब झाल्याचे अर्थातच चोरीला गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हाही नोंद केला आहे.

महत्वाच्या बातम्या