हर्षवर्धन पाटील भाजपात तर अंकिता पाटील कॉंग्रेसचेच काम सुरु ठेवणार

टीम महाराष्ट्र देशा : भाजपची आज मेघाभरती होत आहे. अनेक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाजपत प्रवेश करत आहेत. त्यापैकी कॉंग्रेसनेते आणि इंदापूरचे माजी आ. हर्षवर्धन पाटील देखील भाजपत प्रवेश करत आहेत. त्यामुळे वडिलांच्या पक्षांतरा नंतर अंकिता पाटील काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यावर अंकिता पाटील यांनी भाष्य केले आहे.

एक कुटुंब म्हणून वडीलांच्या निर्णयाचे आम्ही समर्थन करत आहोत. मात्र मी दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आली असून यापुढेही मी तिथेच काम करणार असल्याचं अंकिता पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे वडील भाजपमध्ये जात असले तरी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील कॉंग्रेसचेच काम करणार असल्याच दिसत आहे. पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमा आधी पाटील कुटुंबीयांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले . यावेळी त्यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला.

दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या आठवड्यात कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेत पक्ष प्रवेशाबाबत कौल घेतला होता. तसेच सभेनेही त्यांना भाजपमध्ये जाण्याचा कौल दिला होता. त्यांनीही हा कौल मान्य करून भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार हर्षवर्धन पाटील आज भाजपात जाहीर प्रवेश करणार आहेत. इंदापूरच्या जागेवरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत तिढा निर्माण झाला होता. तर ही जागा राष्ट्रवादी आपल्याकडेचं ठेवणार अशी दाट शक्यता होती. त्यामुळे वारंवार होणाऱ्या फसवणुकीला कंटाळून हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे.