fbpx

‘रिपाई’तर्फे शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे मंगळवारी अभिवादन सभा

रामदास आठवले

पुणे : शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा विजयस्तंभाजवळील पेरणे फाटा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहर यांच्या वतीने जाहीर अभिवादन सभेचे आयोजन केले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले अभिवादन सभेला मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवार, दि. १ जानेवारी २०१९ रोजी दुपारी ३ ऐवजी दुपारी १ वाजता ही सभा होणार असल्याचे पक्षाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

याबाबत माहिती देताना पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव म्हणाले, “शौर्य दिवसाचे औचित्य साधून भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाजवळ दरवर्षी अभिवादन सभेचे आयोजन केले जाते. मात्र, गेल्या वर्षी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा ही अभिवादन सभा पेरणे फाटा टोलनाक्याजवळील परिसरात होणार आहे. येथे २० हजार स्क्वेअर फूटाचा मंडप घालण्यात आला आहे. पुण्यातून १०० बसेसची व्यवस्था पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. तुळापूर नाक्यापासून प्रशासनाने ठेवलेल्या पीएमपीएलच्या बसने सभास्थळी पोहोचावे. त्याचबरोबर भीमा कोरेगाव परिसरातील वातावरण सुरक्षित राहावे, यासाठी पक्षाचे अनेक स्वयंसेवक त्यादिवशी कार्यरत राहणार आहेत.”

या अभिवादन सभेला रिपाईचे राष्ट्रीय सहसचिव अविनाश महातेकर, केंद्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे, केंद्रीय उपाध्यक्ष गंगाधर आंबेडकर, महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष भुपेश थुलकर, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळचे चेअरमन राजाभाऊ सरोदे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, रिपाई नेते परशुराम वाडेकर, हनुमंत साठे, महेश शिंदे, चंद्रकांता सोनकांबळे, सूर्यकांत वाघमारे, अशोक कांबळे, ऍड.आयुब शेख, अशोक शिरोळे, बसवराज गायकवाड, संजय सोनवणे, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे यांच्यासह राज्यभरातील रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.