रिंगरोडच्या बांधकामासाठी दहा हजार कोटी; नितीन गडकरींची घोषणा

पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या 128 किलोमीटर लांबीच्या रिंगरोडच्या बांधकामासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली.

या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाऐवजी पीएमआरडीएला स्वतंत्र कंपनी म्हणून मान्यता देत असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. मात्र, त्यासाठी एकूण जागेच्या ऐंशी टक्के जागेचे भूसंपादन करण्याची अट पीएमआरडीएला घातली. सहा महिन्यांत भूसंपादन पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पुणे विभागातील विविध राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह आमदार, खासदार, महापालिकेचे पदाधिकारी, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी रिंगरोडचे सादरीकरण केले.