राष्ट्रवादी आमदार दिलीप सोपलांवर गुन्हा दाखल

dilip sopal

सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलेले तत्कालीन सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या प्रशासकांनी चौकशी पूर्ण केल्यानंतर बार्शी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे.

बार्शी बाजार समितीतील 2015 -16 च्या अपहार आणि गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन सभापती आमदार सोपल यांच्यासह 18 संचालकांवर बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा विशेष लेखा परिक्षक व्ही व्ही डोके यांनी हा गुन्हा दाखल केला. बाजार समितीमध्ये सुमारे 19 लाख रुपयांचा अपहार, तर 86 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.

बार्शी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने सोपल समर्थक आक्रमक झाले आहेत. समर्थकांनी बार्शीमधील बाजारपेठ बंद करायला लावली आहे.  मात्र दुसरीकडे शिवसेनेचे माजी आमदार तसेच नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले  राजेंद्र राऊत हे बाजारपेठ पूर्ववत करत आहेत. त्यामुळे बार्शीत तणावपूर्ण शांतता आहे.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या अपहाराची प्रशासकांकडून चौकशी सुरु होती. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र सरकारने सुडबुद्धीने कारवाई केली, असा आरोप करत सोपल समर्थक आक्रमक झाले आहेत.