राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे याचं दीर्घ आजाराने मुंबईत निधन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डावखरे यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 10 वाजल्यापासून त्यांचे पार्थिव त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.त्यानंतर दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. वसंत डावखरे मुळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याचे आहेत.

वसंत डावखरे हे ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते होते. 1986 साली त्यांनी ठाणे महापालिकेतून नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. पुढे 1987 साली ते ठाण्याचे महापौर देखील झाले. त्याचबरोबर 1992 पासून ते चारवेळा महाराष्ट्राच्या विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून गेले.