माऊलींची पालखी मार्तंडाच्या विसाव्यात

टीम महाराष्ट्र देशा : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्याल जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सुवर्णनगरीत संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता आगमन झाले. यावेळी जेजुरी नगरपालिका आणि जेजुरी श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने खंडोबा देवाचे लेणे असणारा भंडारा उधळून माउलींचे स्वागत करण्यात आले. या वेळी विठोबा-रखुमाई, माउलींच्या गजरासह येळकोट- येळकोट जयमल्हार असा जयघोष वैष्णव भक्तांनी केला. जेजुरीत हजारो वारकरी बांधवांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. शिव आणि वैष्णव भक्तीचा मिलाफ येथे पाहण्यास मिळाला.

बुधवारी सासवड-जेजुरीची वाट वैष्णवांनी फुलून गेली होती. कुलदैवत खंडोबाच्या दर्शनाची ओढ घेऊन वारकरी रस्ता चालत होते. सोहळ्यात पावसाच्या हलक्या रिमझिम सरी, ऊन-सावली व ढगाळ वातावरण दिवसभर होते.सकाळी बोरावके मळा येथील न्याहारीनंतर दुपारी यमाईशिवरी येथील आदिशक्ती यमाईमातेचे दर्शन, शिवरीकरांचे स्वागत व भोजन उरकून दुपारी पालखी सोहळा मल्हारीभेटीसाठी मार्गस्थ झाला. जेजुरीजवळ येताच व जेजुरीचा गड दिसताच ‘येळकोट.. येळकोट जयमल्हार, सदानंदाचा येळकोट’ असा गजर वैष्णवांच्या दिंड्यांमधून होत होता. अनेक दिंड्यांनी खंडोबा देवाची गाणी, अभंग म्हणत देवाचा जयजयकार केला.

सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जेजुरी गडाच्या पूर्वेला असणार्यां राधाबाई लोणारी ट्रस्टच्या जागेतील भव्य मैदानात संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा विसावला. समाज आरती झाल्यानंतर सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी आपापल्या तंबूकडे रवाना झाले. त्यानंतर जेजुरी व परिसरातील हजारो भाविकांनी रात्री 11 वाजेपर्यंत रांगा लावून माउलींचे दर्शन घेतले.

अक्कलकोट स्वामी समर्थांच्या चरणी माकड !