महापूर आलेल्या क्षेत्रात स्वच्छतेची नितांत गरज, शर्मिला ठाकरेंचे प्रशासनाला आवाहन

टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच या पूरग्रस्तांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करताना दिसत आहे. पूरग्रस्त भागाच्या विकासासाठी विविध सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या आपत्तीग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शर्मिला ठाकरे मनसे कार्यकर्त्यांसह आपत्तीग्रस्त गावात मदत करत आहेत.

यावेळी शर्मिला ठाकरेंनी प्रशासनाने स्वच्छतेला अधिक प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की, संकट खूप मोठं आहे; जी मदत येतेय ती प्रत्येक पुरग्रस्तांपर्यंत पोहचेल ह्याची काळजी घ्या. प्रशासनाला एवढंच सांगेन कि महापुरानंतरच्या स्वच्छतेला अधिक प्राधान्य द्या जेणेकरून रोगराई शमेल आणि जगणं थोडं का पण होईना सुसह्य होईल.

दरम्यान अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न, वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. त्यात आता महापुरामुळे रोगराई पसरू लागली आहे. या हलाखीच्या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे.