प्रियांका चोप्राच्या ‘बेवॉच’ चित्रपटाचा ‘देसी’ ट्रेलर

बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बहुचर्चित ‘बेवॉच’ या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाची गेल्या बर्‍याच महिन्यांपासून चर्चा सुरू होती. प्रियांकाला पाहण्यासाठी तिचे चाहतेही खूप उत्सुक होते. ‘बेवॉच’ हॉलिवूडपटाच्या पहिल्या ट्रेलरमध्ये प्रियांका अवघ्या काही सेकंदांसाठी दिसली होती. त्यामुळे पहिल्या ट्रेलरने प्रियांकाच्या चाहत्यांची निराशा झाली. प्रियांकाच्या ओझरत्या दर्शनावर पडदा टाकून हिंदी चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी ट्रेलरला हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यात आले असल्याच्या देखील चर्चा आहेत. हिंदी ट्रेलमध्ये पहिल्या ट्रेलमधील सर्व दृष्ये कायम ठेवण्यात आली असून फक्त इंग्लिश भाषेचे हिंदीमध्ये रुपांतरित करण्यात आले आहे.

हा चित्रपट २६ मेला प्रदर्शित होणार आहे. ‘बेवॉच’ हा चित्रपट, याच नावाने गाजलेल्या टीव्ही मालिकेवर आधारित आहे. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘बेवॉच’ या चित्रपटातून हॉलिवूड चित्रपटात पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. ड्वेन जॉन्सन ‘द रॉक’ मुख भूमिकेत असून झॅक एफ्रॉन, अलेक्झांड्रा डॅडारिओ, जॉन बॉस हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात प्रियांका खलनायिकेची भूमिका साकारत असून तिचे हॅलोविन स्वरूपातील पोस्टर यापूर्वी ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे तिच्या भूमिकेबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. पहिल्या ट्रेलरमध्ये प्रियांकाचे दिसलेले ओझरते दर्शनामुळे पाठ फिरविणारे चाहते हिंदी भाषेमुळे या नव्या ट्रेलरला पसंती देतील का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

 बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण ‘ट्रिपल एक्सः द रिटन ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर देखील नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. दीपिकाची लोकप्रियता लक्षात घेऊन हा व्हिडिओ तयार करण्यात आल्यामुळे दीपिकाच्या ‘ट्रिपल एक्सः द रिटन ऑफ झेंडर केज’ या हिंदी ट्रेलरला चांगली पसंती मिळत आहे. बॉलिवूडमधील दोन्ही अभिनेत्रींच्यात कोणत्या हिंदी ट्रेलरला अधिक पसंती मिळणार ही देखील स्पर्धा पाहायला मिळू शकते. दीपिका ‘ट्रिपल एक्सः द रिटन ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पणास सज्ज झाली आहे. २०१६ च्या वर्षाअखेर म्हजेच ३१ ‘ट्रिपल एक्सः द रिटन ऑफ झेंडर केज’चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता.