पहिल्या सामन्यात भारताने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा

कर्णधार पृथ्वी शॉने ची साजेशी खेळी

टीम महाराष्ट्र देशा : पृथ्वी शॉच्या युवा टीम इंडियानं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा तब्बल १०० धावांनी धुव्वा उडवत अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या मोहिमेला दिमाखात सुरुवात केली. टीम इंडियानं दिलेल्या ३२९ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा २२८ धावात खुर्दा उडाला. या सामन्यात पृथ्वी शॉने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाने डावाची सुरुवात भक्कमपणे केली. पृथ्वी शॉ आणि मनजोत कालराने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारतीय संघाची भक्कम पायाभरणी केली. मात्र दोन्ही खेळाडूंना शतकाने हुलकावणी दिली. पृथ्वी शॉ ९४ तर मनजोत कालरा ८६ धावांवर माघारी परतला. यानंतर शुभमन गिलने मधल्या फळीतील फलंदाजांना हाताशी धरत भारताची बाजू लावून धरली. या जोरावर भारताने ३२८ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून शिवम मावी आणि कमलेश नागरकोटीनं भेदक गोलंदाजी करताना प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर आभिषेक शर्मा आणि अनूकूल रॉयनं एकेक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या डावाची सुरुवात अतिशय सावधपणे केली. पहिले २ बळी बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव सावरु शकला नाही. ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बाद होत गेले. मधल्या फळीत जोनाथन मेर्लोच्या ३८ धावा आणि अखेरच्या फळीत बॅक्स्टर हॉल्टने केलेल्या ३९ धावांमुळे ऑस्ट्रेलियाने भारताला थोडीशी टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर त्यांची टक्कर टिकू शकली नाही.