निपुण धर्माधिकारीचा ट्रोलर्सना ‘धप्पा’

पुणे : निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. गिरीश कुलकर्णी लिखित सामाजिक विषयावरील या चित्रपटाला ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात राष्ट्रीय एकात्मतेवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘नर्गिस दत्त’ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. मात्र काही लोकांनी या ट्रेलरवरून निपुणला ट्रोल केले आहे, या ट्रोलर्सचा निपुणने आपल्या खास शैलीत समाचार घेत ‘धप्पा’ दिला आहे.

‘धप्पा’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लहान मुले गणेशोत्सवासाठी ‘झाडे पळाली’ हे नाटक बसविण्याचा निर्णय घेतात ज्यामध्ये पर्यावरण संरक्षण विषयीचा संदेश देणार असतात. या नाटकाच्या लेखिकेने वेगवेगळ्या पात्रांच्या मदतीने हा संदेश दिला आहे ज्यामध्ये येशू ख्रिस्त यांच्या पात्राचाही समावेश आहे. मात्र चित्रपटातील पात्रांना ती बाब खटकते आणि परिणामी या लहान मुलांच्या नाटकाला विरोध होतो. ज्या वयाच्या मुलांना ‘राजकारण म्हणजे काय?’ असा प्रश्न पडतो ती मुले या नाटकाचा प्रयोग करण्यासाठी ‘मिशन झॅप झॅप’ आखतात त्याचा रंजक प्रवास चित्रपटात बघायला मिळणार आहे. चित्रपटात लहान मुलांना जो संघर्ष करावा लागतो तोच प्रत्यक्षातही निपुणला करावा लागत असल्याचे दिसते.

या विषयी लिहिताना निपुण धर्माधिकारीने आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे, ‘’या चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. चित्रपट न बघता, ट्रेलर बघूनच अशी प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पण त्या एकात्मतेच्या राष्ट्रीय पुरस्कारापेक्षा तुम्ही म्हणता तेच आम्हाला योग्य वाटत आहे, त्यामुळे आमच्याकडून तुम्हाला ह्या चित्रपटाचं एक तिकिट भेट! अभिनंदन!नक्की बघा! धप्पा!’’