छत्तीसगड : दुर्ग,बेमेतरा जिल्ह्यातील गायींच्या मृत्यू प्रकरणी नऊ अधिकारी निलंबित

रायपूर  : छत्तीसगडमधील दुर्ग आणि बेमेतरा जिल्ह्यातील गोशाळांमधील 170 पेक्षा अधिक गायींच्या मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने नऊ अधिका-यांना निलंबित केले आहे. दुर्ग,बेमेतरा जिल्ह्यातील गोशाळांमधील गायींच्या मृत्यूमागील कारणे स्पष्ट झाली आहेत,असे गो सेवा आयोगाचे अध्यक्ष विशेषर पटेल यांनी सांगितले. दुर्ग जिल्ह्यातील धमधा येथील राजपूर गावात असलेल्या शगुन गोशाळेत ५२, तर बेमेतरा जिल्ह्यातील गोडर्मा गावातील फुलचंद गोशाळेतील १०६ आणि साजा क्षेत्रातील रानो गावमधील मयुरी गोशाळेत १५ गायींचा मृत्यू झाला. राजपूर गोशाळेतील गायींच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर गोशाळेचे संचालक हरीश वर्मा यांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य दोन गोशाळांच्या संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.