चिंताजनक : राज्यातील बारा जिल्ह्यात दुष्काळ ?

टीम महाराष्ट्र देशा : अपुरा पाऊस, पाण्याची टंचाई आणि त्याचा पिकांवर झालेला परिणाम यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे संकट घोंगावू लागले आहे. राज्यातील १२ जिल्ह्य़ांतील १७० तालुक्यांत सरासरीच्या ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला असून या भागांतील पिकेही धोक्यात आली आहेत.

या पाश्र्वभूमीवर मराठवाडय़ातील औरंगाबाद,उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार,जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्य़ांत दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. त्यानुसार कमी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागास देण्यात आले आहेत. दुष्काळ जाहीर करण्याबाबत केंद्राच्या निकषानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत राज्यातील टंचाई परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. त्याचवेळी संभाव्य दुष्काळाचे आयते कोलीत विरोधकांच्या हाती मिळू नये यासाठी आतापासूनच उपायोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरणे उभे असल्याचा संदेश लोकांपर्यंत जाऊ देण्याची खबरदारी घेण्याच्या सूचना सबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

You might also like
Comments
Loading...