गरजू मुलांवर ज्युपिटरमध्ये शस्त्रक्रिया होणार !

ठाणे : स्वातंत्र्यदिनानिमित्ताने लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात सेरेब्रल पाल्सीने आजारी असलेल्या ७० हून अधिक मुलांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात आढळलेल्या गरजू मुलांवर ज्युपिटर रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जाणार आहे. लायन्स क्लबच्या खोपट येथील जयश्री राज लायन्स मेडीकल सेंटरमध्ये झालेल्या शिबिराचे उद्घाटन आज सकाळी करण्यात आले. या कार्यक्रमाला क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या शिबिराला सेलेब्रल पाल्सीने त्रस्त ७० हून अधिक मुलांचे पालक उपस्थित होते. या मुलांची तज्ज्ञ डॉक्टर डॉ. सचिन कुलकर्णी, डॉ. संगीत गंगाधरन आणि डॉ. श्रुती पाटील यांनी तपासणी केली. या शिबिरात आढळलेल्या काही मुलांवर ज्युपिटर रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तसेच शिबिरात नोंदणी झालेल्या गरजू मुलांना दररोज मोफत फिजिओथेरेपी दिली जाणार आहे. आगामी काळातही त्यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती मेडिकल सेंटरचे चेअरमन लायन राजपत तिवारी यांनी दिली. सेरेब्रल पाल्सीबरोबरच जन्मतः अस्थिव्यंग असलेल्या मुलांचीही शिबिरात तपासणी करण्यात आली.