कॉंग्रेसचा युटर्न; सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगाबाबतची याचिका मागे

नवी दिल्ली – सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात कॉंग्रेसने दाखल केलेला महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर या निर्णयाविरोधात कॉंग्रेसकडून सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, आज कॉंग्रेसकडून ही याचिका मागे घेण्यात आली आहे. पुरेस  संख्याबळ नसल्यामुळे  हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रताप सिंह बाजवा आणि अमी याग्निक यांनी सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टातील कथीत गैरप्रकाराबाबत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर आरोप करीत काँग्रेस आणि काही विरोधी पक्षांनी त्यांना सरन्यायाधीश पदावरून हटवण्यासाठी महाभियोग आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी राज्यसभेत नोटीसही पाठवली होती. मात्र, राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता.

यानंतर काँग्रेस अधिकच आक्रमक झाली होती. उपराष्ट्रपतींना हा प्रस्ताव फेटाळण्याचा अधिकार नाही, असे काँग्रेसने म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या निर्णयोविरोधात काँग्रेसने सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल केली होती.  आज या याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. मात्र, तत्पूर्वीच काँग्रेसने अचानक आपली याचिका मागे घेतली.

दरम्यान, ज्या सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी होणार होती. त्यांनीही यापूर्वी असा प्रस्ताव आणणे योग्य नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे देशाच्या न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास राहणार नाही असे मत व्यक्त केले होते.