काकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा भाजपकडून निषेध

पुणे : पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे आपल्या परखड वक्त्यांमुळे कायम चर्चेत राहतात. मग पुणे महापालिकेतील विजयाचे भाकीत असो कि पाच राज्यातील प्रभावाचे विश्लेषण. आता मागील काही दिवसांपासून काकडे यांनी थेट भाजप नेत्यांशीच पंगा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे खुद्द भाजपलाच आपले सहयोगी खासदार असणारे काकडे यांच्या निषेधाचे निवेदन प्रसिद्ध करावे लागले आहे.

दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुणे लोकसभेची आढावा बैठक घेतली. यामध्ये शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र लोकसभेसाठी इच्छुक असणारे खा काकडे यांना बैठकीतून डावलण्यात आले होते. त्यामुळे नाराज झालेल्या काकडे यांनी थेट दानवे यांच्यावरच तोफ डागली होती.

आम्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती न केल्यास भाजपला मोठा फटका बसेल. ४८ पैकी ४० मतदारसंघ तर सोडाच पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना स्वत:च्या मतदारसंघातही जिंकता येणार नाही. त्यांचा दीड-दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य संजय काकडे यांनी शुक्रवारी केले आहे. यावरूनच आता काकडे यांच्या विरोधात भाजपमधून सुरु उमटतात दिसत आहेत.

पुणे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी काकडेंच्या वक्तव्याचा निषेध करत निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्याबद्दल खासदार संजय काकडे यांनी केलेल्या वक्तव्याचा पुणे शहर भारतीय जनता पार्टी, पक्षाचे एक खासदार, आठ आमदार व महापालिकेतील ९६ नगरसेवकांच्या वतीने निषेध नोंदवत असल्याचं म्हंटल आहे.

भारतीय जनता पार्टीची निश्चित ध्येयधोरणे व संघटनात्मक कार्यप्रणाली आहे. संघटनेच्या महत्वाच्या बैठकीला कोणाला बोलवायचे आणि कोणाला नाही याबाबत संघटना पातळीवर निर्णय घेतले जातात. काकडे यांना या कार्यपध्दतीची माहिती नसावी, म्हणून ते बेजबाबदारपणे विधाने करीत आहेत. त्यांची विधाने पक्ष संघटनेच्या विरोधातील व पक्षहिताला बाधा आणणारी आहेत. राजकीय विधान करताना शब्दांचा जपून वापर केला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत असल्याचे गोगावले यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.