उठा मर्दांनो घ्या भरारी, करा MPSC ची तयारी अन वाढावा बेकारी !!

उठा मर्दांनो घ्या भरारी, करा MPSC ची तयारी अन वाढावा बेकारी !! ( कृपया अधिकारी असे वाचावे )
– हो अगदी असंच म्हणनायची वेळ आलीय अन त्याची कारणं ही तशीच आहेत.जरा सविस्तर सांगायचं झालं तर तर विषय असा आहे की लहानपणी शाळेतल्या शिक्षकापासून ते घरी येणाऱ्या प्रत्येक पाहूण्यापर्यंत सगळे जण विचारायचे तुला काय व्हायचंय ?? मग मी सांगायचो मला मोठं झाल्यावर पोलीस व्हायचंय. कारण त्या वेळी पोलीस गावात आला तरी भीती वाटायची, त्या काळात वडीलधाऱ्यां मध्ये सुद्धा पोलिसांची धास्ती होती आता ती कमी होत चालली आहे. त्याला मुख्यत्वे पोलिसांसहित बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत.तर मग त्या रम्य बालपणी पोलीस दिसला तरी उरात धडकी भरायची मी घरातल्या कणगी मागे लपून बसायचो म्हणून मला पोलीस व्हावे वाटायचे.मग जरा समज आल्यानंतर मी शिक्षक होणार म्हणायचो. जशी जशी थोडी थोडी दुनियादारी कळू लागली मग ज्या ज्या गोष्टीचं आकर्षण वाटत गेलं तसं तसं मी डॉक्टर, अभिनेता, नेता …., मंत्री होणार असं लोकांना सांगत असायचो.तो एक प्रवाह होता ,,जाऊ द्या विषयांतर होतंय !!

तसं आजही सगळे आम आदमी बऱ्याच बाबतीत कोणताही एक प्रवाह तयार करतात त्या प्रवाहासोबत वाहत जातात. असं प्रत्येकाच्या बाबतीत होतं पण आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रत्येकाला कळतं की आपली आवड काहीतरी वेगळीच आहे, गरज वेगळी आहे पण तो पर्यंत पुला खालून बरंच पाणी गेलेलं असतं.त्यावेळी पद ,पैसा , प्रसिद्धी, बेगडी प्रतिष्ठा या गोष्टी पेक्षा मनाला आवड असणाऱ्या गोष्टीत मन रमतं अन तिथं आयुष्याचा खरा तुझ्यात जीव रंगला चा खेळ सुरू होतो. काही लोकं करियर आणि आवड याची सांगड घालण्यात यशस्वी पण होतात. लिहण्याचं कारण असं की हल्ली शिक्षणात ही लोकांचा ओढा मेंढ्या सारखा एकाच दिशेला जातोय. मुलांच्या क्षमतेचा , गुणांचा, भावनांचा आवडी निवडीचा विचार होत नाही अन त्यातूनच अनेक प्रश्न तयार होतात. आता तुम्हीच पहा ना मागे काही वर्षापूर्वी एक काळ असा होता बारावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारे बहुतांशी मुलं-मुली D. ed ला जायची. मग तोच लोंढा इंजिनियरींग कडे वळला. आधी D.ed मग इंजिनियरिंग चा कसा बोऱ्या वाजला हे सगळ्यांचा माहिती आहे.

pune mpsc student
file photo

आता तसेच टोळके च्या टोळके स्पर्धा परीक्षा कडे वळली आहेत. त्याला कारणं ही तशीच आहेत , परीक्षा पास झाल्यानंतर मिळणारी सुरक्षा, प्रतिष्ठा,सन्मान मान, माल…,त्यात ही भरीस भर म्हणून मधल्या काळात काही
दहा-पाच चमकोगिरी करणाऱ्या चमकेश अधिकाऱ्यांनी ( आता तुम्ही म्हणाल ते कित्येकांसाठी आयडॉल आहेत, असू की द्या माझ्यासाठी ही होती पण जश्या जश्या विचारांच्या कशा रुंदावल्या तसं तसं यांचा दांभिकपणा कळू लागला ) अधिकाऱ्यांनी MPSC/UPSC पास केली म्हणजे जग जिंकलं असा भास आपल्या बोल बच्चन द्वारे महाराष्ट्र भर निर्माण केला. त्यांची लाल दिव्याची ( सरकार ची बरं ) गाडी ,वर्दी, दर्दी, गर्दी , रुबाब,रुतबा…,काहींनी तर ट्रेनिंग व्हायच्या अगोदरच त्यांची वयक्तिक पुस्तके, कॅसेट, व्हिडीओ क्लिपचं भांडार तयार करून ठेवलं.

सैरा वैरा भाषणे ठोकली जसे काही महाराज कीर्तन झाल्यावर त्यांच्या C. D, कॅसेट विकतात तशी यांनी भावनिक नावे देऊन पुस्तकं छापली अन विकली देखील. क्लासेस वाल्यांनी त्यांच्या भोवती वलय निर्माण करून इकडे ईमल्यावर इमले चढवले. आप आपल्या तुंबड्या भरून घेतल्या.( खरं तर ती हवा करणारे सध्या कुठं आहेत याचा काही मेळ नाही, तुकाराम मुंढे सारखे अनेक चांगले अधिकारी ही खूप आहेत पण ते त्यांच्या कामातून जास्त बोलतात ) आता येऊ मुद्द्यावर तर आता ही स्पर्धा परिक्षा देऊ नये असं मत माझं मुळीच नाही. देशासाठी काहीतरी करून दाखवण्याचा हा खूप चांगला मार्ग आहे. तुम्हाला जर खरंच आवड असेल तर आयुष्यातील काही ठराविक वर्ष यासाठी द्या पण नसेल होत तर पर्याय B तयार ठेवलाच पाहिजे.
या सगळ्या परीक्षेचा, प्रक्रियेचा बारीक अभ्यास केला तर तर जवळपास 0.86 टक्के इतका कमी सक्सेस रेट आहे. कारण सरकारी जागा भरतीला मर्यादा असते. (गेल्या काही वर्षात तर सरकारी भरतीचे प्रमाण खूपच कमी झाले आहे )

मागे एका परीक्षेचा निकाल तर 100 पैकी 100 वर लागला होता, वेटिंग वर असणारे सुद्धा 100 वर होते. आता विचार करा ती वेटिंग वर असनारी कुठंच कमी पडली नाहीत. मग अशावेळी सरकार आणि खास करून ते हवा करणारे काही अधिकारी, क्लास वाले अन त्यांच्या कहाण्या दाखवून आपला TRP तेजीत ठेवणारे लोकं
या लाखो अपयशी जीवांच्या अपयशाची जिम्मेदारी घेतील का ?क्लास वाले करोड पती झाले, सिलेक्ट झाले त्यांची हवा (चांदी) झाली , पण लाखोंच्या घरात अन नैराश्याच्या दारात उभे राहिलेल्या बाकीच्यांच काय ???
आज ही पुण्यातल्या बुधवार पेठे सहित कोणत्याही पेठेत MPSC म्हणून एक आरोळी ठोकली तरी मोदींच्या सभेला जमते तशी गर्दी जमा होईल. त्यातले कित्येक नैराश्याच्या खाईत,चिंताग्रस्त-चिंतातुर दिसतील, त्यांच्या चेहऱ्यावर स्वप्न आणि डोळ्यात डोळे वासून वाट पाहत बसलेले आई-वडील, भाऊ बहीण, प्रेयसी दिसेल.

स्वप्न विकणाऱ्यांवर MPSC सोडूनही ही दुनिया खूप मोठी आहे. पद,पैसे ,प्रतिष्ठा अन गर्दीच पाहिजे असेल तर ते देणाऱ्या,असणाऱ्या अन महत्वाचं म्हणजे समाधान देणाऱ्या खूप गोष्टी आहेत.
उद्या त्याच पोरामधून दहावी नापास असताना देखील 100 कोटींची कमाई करणारा, शाळेतल्या आर्ची-परश्या च्या सुरक्षेसाठी IPS अधिकारी उभा करायला लावणारा नागराज मंजुळे लोकांना दिसत नाही.
सैन्यातले सैनिक असणाऱ्या अण्णा हजारे ना देखील क्लास वन अधिकारी सुरक्षेला आहेत. चौथी पास असणाऱ्या कित्येक मंत्र्यांच्या दिमतीला IAS अधिकारी आहेत. नामदेव ढसाळ UPSC करीत नव्हते पण त्याचं साहित्य UPSC करणाऱ्यांना अभ्यासावं लागत.UPSC न करता देखील आपआपल्या क्षेत्रात यशाची शिखर गाठणारे बाबा आमटे,पोपटराव पवार,अभय बंग, मकरंद अनासपुरे,बच्चू कडू, निखिल वागळे, उज्जल निकम, गुरू ठाकूर, अजय -अतुल, रघुनाथ माशेलकर,डॉ.तात्या लहाने ते इंदूरीकर महाराज अशी कितीतरी लोकं आहेत, क्षेत्र आहेत. प्रामाणिक तयारी करणाऱ्यांचं खच्चीकरण करायचा मुळीच हेतू नाही पण त्या क्षेत्राची मर्यादा आपण ओळखली पाहिजे. सांगायचा उद्देश एवढाच की मागच्या वेळी 69 जागेसाठी जवळपास पाच-सात लाखाच्या घरात अर्ज आले होते. आजही गावाकडून लोंढ्याच्या लोंढे पुण्या-मुंबईला, औरंगाबाद, नागपूर ला येत आहेत.

आजही दहा लाखाच्या आसपास मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. खरं तर वर वरच्या चमकोगिरी ला भुलून ही अनेक मुलं या क्षेत्राकडे आकर्षित होतात. यात गैर काही नाही पण प्रत्येकाने आप आपलं टॅलेंट ओळखलं पाहिजे. वडीलधार्यांनी त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे. एखादा अधिकारी नाही झाला तर तो उत्तम गायक ,उत्तम खेळाडू, चांगला चित्रकार, चांगला पत्रकार , व्याख्याता लेखक, कवी होऊ शकतो. पण दुर्दैवाने आपला मीडिया ही या इतर क्षेत्रातील मंडळींना पाहिजे त्या प्रमाणात साथ देत नाहीत पण MPSC -UPSC तील अधिकाऱ्यांच्या रसभरीत कहाण्या तेल मीठ लावून जगाला सांगतात. नाण्याची दुसरी बाजू प्रकाश झोतात येत नाही. खेळामध्ये जसं क्रिकेट, क्रिकेट अन क्रिकेट च्या नादात इतर खेळाडूंचे दुःख कोणी ऐकून घेण्याच्या तयारीत सुद्धा राहत नाही तसं या क्षेत्राचे झाले आहे.

अनेक मुलं फार्मसी ,इजिनियरिंग, मेडिकल चे शिक्षण घेऊन या क्षेत्रात नौकरी करतात म्हणजे पाच वर्षे शिकलेल्या मेडिकल च्या ज्ञानाचा समाजाला काय उपयोग झाला ?? त्याच्या जागेवर दुसऱ्या एखाद्या होतकरू ला संधी नसती का मिळाली ? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात.या निमित्ताने एकूणच या गोष्टी बरोबरचं याची कारणे, उपाय, बेरोजगारी, शिक्षण पद्धती, येणाऱ्या काळातील संधी, उपलब्ध असणारे सोर्स, या गोष्टी ची चर्चा विचार विनिमय व्हायला पाहिजे.स्पर्धा परीक्षा पास झालेल्या दहा पाच संघर्षकथा जगाला सांगण्याबरोबरच अपयशी झालेल्या लाखोंच्या कहाण्या देखील लोकांसमोर मांडणे गरजेचे आहे. कारण नाण्याला नेहमी दोन बाजू असतात.

– चांगदेव गिते

आंबेनळी दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी – मोदी

‘ह्या’ भाज्या पावसाळ्यात चुकून सुद्धा खाऊ नका !