अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत माजी खासदार ‘आप’ मध्ये प्रवेश करणार

आज पत्रकार परिषेदेत घोषणा

औरंगाबाद : सिंदखेड राजा येथे १२ जानेवारीला अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत कर्नल सुधीर सावंत आप मध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रिती मेनन यांनी पत्रकार परिषेदेत केली. केजरीवाल यांच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत सुभेदारी विश्रामगृह येथे एक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात प्रिती मेनन यांनी सांगितले की, सिंदखेडराजा येथे महाराष्ट्र संकल्प सभा होणार आहे. या सभेला सुरक्षेच्या कारणावरून आधी परवानगी नाकारली होती पण कार्यकर्त्याच्या आंदोलनानंतर प्रशासनाने परवानगी दिली. या सभेसाठी आपकडून सध्या जय्यत तयारी केली जात आहे.

आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त बुलडाणा तालुक्यातील सिंदखेड राजा येथे येत असून राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन लाखो जिजाऊभक्तांच्या साक्षिने महाराष्ट्रामध्ये २०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणूकांचा बिगुल फुंकणार आहेर. हि सभा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी असल्याची चर्चा होत आहे. महारष्ट्रातील सिंदखेडराजा येथे येणार असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी ट्विटर वरून दिली होती. सुरूवातीला पोलिसांनी केजरीवाल यांच्या सभेला परवानगी नाकारली होती. नंतर पोलिसांनी या सभेला परवानगी दिल्याचे समजते. त्यामुळेच केजरीवाल यांनी मराठीतून ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार असल्याचे म्हटले होते.

सिंदखेड राजा येथे केजरीवाल यांच्या उपस्थितीत राज्यातील पर्यायी राजकारणाची घोषणा होणार आहे. भाजपा व काँग्रेस यांचे जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरणाच्या राजकारणाच्या धोरणामुळे देशात अराजकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली मॉडेल राजकारणाचा पर्याय निर्माण करून राजकारणाच्या मुद्दय़ावर सिंधुदुर्गात स्वतंत्र पॅटर्न राबवून दहशतवाद, गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी समविचारी पक्षांशी समझोता करू असे शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी सांगितले होते.