fbpx

भाजपला धक्का:  ‘हा’ माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यासारख्या राजकीय घडामोडींना उधान आले आहे. तसेच निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील नेते भाजप शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते एकापाठोपाठ भाजपमध्ये जात असताना उपराजधानीत मात्र उलटी गंगा वाहत असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे.

भाजपचे हिंगण्याचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेने जोर पकडला आहे. एका हॉटेलमध्ये मंगळवारी सकाळी विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश बंग यांची भेट घेतली.भेटीतील चर्चेचा तपशील बाहेर येऊ शकला नाही. पण विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविण्यासाठी ही भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी मधील चित्रा वाघ, सचिन आहिर, वैभव पिचड, धनंजय महाडिक यासह आदी नेत्यांनी भाजप शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र आत्ता नागपूर मधील माजी आमदार विजय घोडमारे हे भाजप सोडून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असल्यामुळे उपराजधानीत मात्र उलटी गंगा वाहत असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे.