fbpx

अल्पसंख्याक महिलांना स्वावलंबी करण्यासाठी विशेष मोहिम राबविणार : पंकजा मुंडे

pankaja munde

परळी : महिलांना कमी लेखण्याची शिकवण कोणत्याही धर्मात नाही, त्यामुळे ही मानसिकता आता बदलली गेली पाहिजे, त्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून महिलांना ताकद देण्याचा मी प्रयत्न करत आहे. अल्पसंख्याक समाजातील महिलांनी देखील पुढे यावे, त्यांना स्वावलंबी करण्यासाठी विशेष योजना राबविणार आहे, त्यामुळे महिलांनो पुढे या, तुमचाही विकास मला साध्य करायचाय असे आवाहन करत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण समारंभानिमित्त बोलत होत्या.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. महिलांना ताकद मिळाली नाही तर देश पुढे जाणार नाही, त्यामुळे त्यांना ताकद देण्याची जबाबदारी आपणा सर्वाची आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा नारा देण्याबरोबरच बेटी को आगे बढाओ चा नारा आम्ही दिला आहे, त्यादृष्टीने आम्ही पाऊले उचलत आहोत.

अल्पसंख्याक समाजातील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी विशेष काम मी करत आहे, त्यासाठी योजना आणली आहे. या समाजातील मुला- मुलींना चांगले शिक्षण मिळावे, ते उच्च पदांवर बसावेत यासाठी माझे प्रयत्न आहेत. मला तुमच्या जीवनात अमुलाग्र बदल करायचा आहे. सब का साथ सबका विकास याबरोबरच सब का विश्वास आम्ही जिंकला आहे असे त्या म्हणाल्या.

महेबुबिया शिक्षण संस्था व अंजूमन शिक्षण संस्थेच्या वतीने मराठी आणि उर्दू माध्यमातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, शेख अब्दुल करीम, वहाजुद्दीन मुल्ला, खालेद राज, बाबू नंबरदार आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष बहादूर भाई व सचिव शेख खाजा शेख मेहताब यांनी पंकजा मुंडे यांचे यावेळी जोरदार स्वागत केले.