Explained । पुणे भाजपचे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा आवाका किती?

भाजपने मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना खासदारकीसाठी तिकीट दिलं

Muralidhar Mohol Pune BJP Loksabha Candidate। भाजपने लोकसभा निवडणुकासाठी (13 मार्च) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

सर्वांचे लक्ष पुणे आणि बीड मदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लागले होते. पुण्यातून लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळाली तर बीड मध्ये विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांना डावलून पंकजा मुंडे यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, ”मला खात्री आहे पुणे लोकसभामधून मोठ्या मताधिक्याने निवडून येईन, मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून पक्ष नेतृत्वाला धन्यवाद, असं म्हणत मोहोळ यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत.

पुण्यात भाजपचा बाल्लेकिला अशी ओळख गिरीश बापट यांनी केली होती. बापटांनी पुण्यात पक्षाची उत्कृष्ट बांधणी केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटलांना पक्षाची बांधणी करण्यात अपयश आले.

Who is Dhangekar? म्हणून काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांना हिणवणाऱ्या चंद्रकांत पाटलांना पुण्यातील मतदारांनी कात्रजचा घाट दाखवला होता. यावेळी ही लोकसभेच्या स्टार प्रचारक यादीत पाटलांचे नाव असणार आहे. त्यामुळे पुणेकर त्यांना साथ देतील का? हे येणाऱ्या काळात कळेल.

पुणे भाजप मध्ये अंतर्गत कलह आहे. लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी जगदीश मुळीक, स्वरदा बापट, सुनील देवधर, धीरज घाटे आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात रस्सीखेच होती. उमेदवारी मिळवण्यासाठी जगदीश मुळीक यांनी फडणवींसांची भेट घेतली होती. पुणे लोकसभेला माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर मुळीक विरुद्ध मोहोळ वाद उफाळून आला होता.

मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवण्यात आल्यानंतर जगदीश मुळीक यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरु होती. मात्र भाजपच्या यादीत मुरलीधर मोहोळ यांचे नाव आले.

मुरलीधर मोहोळांविरोधात बॅनरबाजी

पुणे महापालिकेच्या परिसरामध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरमध्ये म्हटलं होतं की, स्टॅंडिंग दिली, महापौर केलं, सरचिटणीस पण केलं, आता खासदारकी पण? आता बास झालं, तुला नक्की पाडणार. कष्टाळू भाजप कार्यकर्ते. अशा मजकुराचा बॅनर लावल्याने पुणे भाजप मधील वाद चव्हाटयावर आला होता.

पुणे लोकसभा मतदारसंघात ब्राह्मण समाजाचा वरचष्मा राहिला आहे. ब्राह्मण समाज तसा भाजपचा पारंपरिक मतदार मानला जातो, मात्र ब्राह्मण समाजाचा विचार न करता उमेदवार दिला गेला आहे. याने ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतात.

मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा दिल्याने ब्राह्मण समाजाला खूश केल्याचं सांगितलं जातंय, मात्र तरीही गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांना डावलून मराठा चेहरा असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी दिल्याने पुण्यातील ब्राह्मण समाज त्यांना स्वीकारतो की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

दुसरीकडे, मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक लोकसभेच्या तिकीटावरून चढाओढ सुरु होती. इतकंच काय तर मोहोळ आणि मुळीक दोन्ही समर्थकांकडून अनेक वेळा भावी खासदारांचे बॅनरदेखील झळकवण्यात आले होते. पण, आता मुरलीधर मोहोळ यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर आता जगदीश मुळीक काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शहरात भाजपकडे अनेक मोठमोठे नेते आहेत, वरकरणी सगळे एकमेकांशी गोडगोड वागताना दिसत असले, तरी एकमेकांवर कुरघोडी करतांना दिसत असतात. शहराध्यक्षाची निवड असेल वा गिरीश बापट यांच्या निधनानंतर झालेली फ्लेक्सबाजी असेल. एकमेकांचे पाय ओढण्याच्या नादात आणि पक्ष अंतर्गत वादामुळे भाजपला ही पुणे लोकसभेची जागा गमवावी सुद्धा लागू शकते.

मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर (Muralidhar Mohol vs Ravindra Dhangekar ) 

कसब्यात मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने हेमंत रासने यांना संधी दिली होती, मात्र कसब्यात सगळ्यात धक्कादायक पराभवाची नोंद झाली. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपला जोरदार धक्का दिला, त्याचे दणके दिल्लीपर्यंत जाणवले. अतिआत्मविश्वास असलेल्या भाजप नेत्यांचा मतदारांनी बालेकिल्ल्यात पराभव केला.

महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये पुणे लोकसभेची (Pune Loksabha Election) जागा ही काँग्रेसकडे आहे. कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर लोकसभेसाठी इच्छुक आहे. काँग्रेसमध्ये धंगेकर यांचे नाव आघाडीवर आहेत. आमदार धंगेकर यांनी गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या दृष्टीने आपला प्रचार सुरू केला आहे.

‘हक्काचा माणूस ‘ अशी ओळख आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची असून त्यांनी गेल्या काही महिन्यातच लोकांमध्ये जाऊन आपली वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे. महागाई, शहरात वाढलेली वाढती गुन्हेगारी, ड्रग्ज अशा विविध प्रश्नांवर धंगेकर यांनी आवाज उठविला आहे. तसेच कसबा भागातील विविध विकास कामे यानिमित्ताने ते नागरिकांशी जोडलेले असतात.

त्यामुळे काँग्रेसने धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास आणि पक्ष अंतर्गत वादामुळे मोहोळ यांना निवडणूक सोपी जाणार नाही. गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांना डावलून मोहोळ यांना तिकीट दिल्याने पुणेकर त्यांना स्वीकारतील का हे पाहणे महत्वाचे असणार आहे. या लोकसभेला मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी लढत पाहायला मिळणार अशी चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.