fbpx

‘आमदार बच्चू कडू हे केवळ प्रसिद्धीसाठीचं अपंगांची सेवा करतात’

bacchu kadu

टीम महाराष्ट्र देशा : प्रहार संघटनेचे नेते आ. बच्चू कडू हे अपंगग्रस्तांच्या मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेत असतात. मात्र आता त्यांच्या या समाजसेवेवर काही आरोप करण्यात आले आहेत. अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी 2011 ते 2017 पर्यंत अपंगांकरिता मिळणाऱ्या आमदार निधीपैकी एक रुपयाही खर्च केलेला नाही. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांना केवळ प्रसिद्धी पुरताच अपंगांची सेवा करतात, असा आरोप चांदूरबाजार नगरपरिषदेतील नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी केला आहे.

आमदार बच्चू कडू यांच्या पत्नी डॉ. नयना कडू यांच्या मालकीचे असणारे कमलापूर येथील निवासी मूकबधिर महाविद्यालयातील गैर प्रकाराची माहिती उघड करण्याच्या उद्देशाने नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी पत्रकार परिषद घेतली. टोंगलाबाद येथील डॉ. नयना कडू यांच्या मालकीच्या निवासी मूकबधिर विद्यालयाच्या शौचालयाचे व इतर बांधकाम नियमबाह्य असून त्यांच्या इतर सहकारी संस्थांवरही थकबाकी आहे. मात्र प्रशासन राजकीय दबावापोटी बच्चू कडूंवर कारवाई करीत नाही, असे गोपाळ तिरमारे यांनी म्हटले आहे.

आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम सर्वसाधारण अनुज्ञेय कामांच्या यादीमध्ये अंध, अपंग व मतिमंद मुलांकरिता एका आर्थिक वर्षात एकूण दोन कोटी निधीपैकी पंधरा लाखांचा निधी खर्च करण्याची तरतूद आहे. असे असताना 2011 ते 2017 पर्यंत आमदार बच्चू कडू यांनी अपंगांकरिता एक पैसाही खर्च केला नाही, अशी माहिती माहिती अधिकारात प्राप्त झाली असल्याचे गोपाल तिरमारे म्हणाले.