fbpx

कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी शमीला दिलासा; न्यायालयाने दिला हा निर्णय…

mohammad shami and haseen jahan

टीम महाराष्ट्र देशा:-भारतीय संघाचा वेगवान  गोलंदाज मोहम्मद शमीला न्यायालयाने सोमवारी मोठा दिलासा दिला आहे.शमीविरोधात जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंटला पश्चिम बंगालमधील अलीपूर जिल्हा न्यायलयाने स्थगिती दिली आहे. शमीचे वकील सलीम रहमान यांनी ही माहिती दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

पत्नी हसीन जहां हिने शमीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून पत्नी हसीन जहां आणि मोहंमद शमी यांच्यात वाद सुरू आहेत. यापूर्वी हसीन जहांने शमीवर विवाहबाह्य संबंधांसह चक्क मॅच फिक्सिंगचे देखील आरोप केले होते. त्या प्रकरणात शमीला आधीच क्लीनचिट मिळाली होती .

शमीचे वकील सलीम रेहमान यांनी सोमवारी सांगितले, की अलीपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राय चट्टोपध्याय यांनी शमीच्या अटकेवर स्थगिती आणली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. शमीच्या विरोधात अटकेचे आदेश काढण्यात आले त्यावेळी तो भारतात नव्हता. तो टीम इंडियासोबत वेस्ट इंडीज दौऱ्यावर होता. वेस्ट इंडीज दौरा संपल्यानंतर शमी अमेरिकेला गेला आहे. तो बीसीसीआयबरोबरच वकिलाच्याही संपर्कात आहे.

दरम्यान जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत शमीविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, शमी १२ सप्टेंबरला भारतात परतेल. सध्या तो आपले वकील सलीम रहमान यांच्याशी संपर्कात आहे.