fbpx

बीड : वीस लाख मतदार निवडणार सहा आमदार

बीड : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने शनिवारी जिल्ह्यातील सहा मतदारसंघांतील मतदारांच्या अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या. यामध्ये 31 हजार 300 नवमतदार वाढले असून सहा विधानसभा मतदारसंघांत आता 20 लाख 59 हजार 639 हजार मतदार सहा आमदारांची निवड करणार आहेत. जिल्ह्यात दोन हजार 311 मतदान केंद्रांवर निवडणुका पार पडणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सध्या कामाला लागले आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात एकूण 20 लाख 28 हजार 339 मतदारांची संख्या होती. 31 ऑगस्टला प्रसिद्ध केलेल्या यादीत 31 हजार 300 नवमतदारांची वाढ झालेली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत एकूण 20 लाख 59 हजार 639 मतदार झाले आहेत. विधानसभा निवडणुकीची जवळजवळ सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. आता आचारसंहिता लागण्याची प्रतीक्षा आहे. सहा विधानसभा मतदारसंघांसाठी जिल्ह्यात दोन हजार 311 मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहेत.

यामध्ये केजमध्ये 403, परळी 335, गेवराई 395, माजलगाव 374, बीड 366, आष्टी 438 मतदान केंद्रांचा समावेश आहे. आष्टी मतदारसंघात सर्वात जास्त मतदान केंद्र असणार आहेत. सध्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राजकीय नेते आपापल्या सोयीनुसार मतदारांच्या गाठीभेटी घेऊ लागले आहेत. गणेशोत्सव संपल्यानंतर लगेच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची तपासणी पूर्ण

जिल्ह्यात सहा मतदारसंघ असून केज, गेवराई, परळी, बीड, आष्टी, माजलगावचा समावेश होते. या ठिकाणी लागणाऱ्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनची संपूर्ण तपासणीची प्रक्रिया जवळ जवळ पूर्ण झालेली आहे.