fbpx

औरंगाबाद: मेगा सर्किटच्या निधीसाठी महापालिकेला मिळणार तब्बल एवढे कोटी

औरंगाबाद: केंद्र शासनाच्या मेगा सर्किट योजनेअंतर्गत 2013 मध्ये महापालिकेचे विविध कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्याचा निधी मिळाला. मात्र दुसऱ्या टप्प्यासाठी तब्बल सहा वर्षे वाट पाहावी लागली. आता दोन कोटी 82 लाख रुपये महापालिकेला मिळणार आहेत.

अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत पर्यटन मंत्रालयाचा ‘सर्किट डेव्हलपमेंट फॉर औरंगाबाद’ प्रकल्प डिसेंबर 2013 मध्ये मंजूर झाला. याअंतर्गत बिबी-का-मकबरा, पाणचक्की, नगारखाना गेट, टुरिस्ट टॅक्सी स्टॅंड, दुभाजकांचे सुशोभीकरण, रोझ गार्डन या शहरातील प्रकल्पांसह जिल्ह्यातील दौलताबाद किल्ला, अजिंठा व्ह्यू पॉइंट, बनी बेगम बाग आणि आणि देवगड घाट येथे 23 कोटी 43 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

एमटीडीसी’मार्फत हा निधी देण्यात आला. मात्र निधीअभावी कामे रखडली होती. पहिल्या टप्प्याचा निधी मिळाल्यानंतर तब्बल सहा वर्षे दुसऱ्या टप्प्यासाठी वाट पाहावी लागली. पहिल्या टप्प्याच्या निधीतून महापालिकेने दुभाजकांचे सुशोभीकरण व रोझ गार्डनचे काम केले. मात्र रोझ गार्डनसाठी निधी कमी पडला. त्यामुळे महापालिकेला पैसे टाकावे लागले. दोन कोटी 81 लाख रुपये शिल्लक असल्यामुळे महापालिकेचा पाठपुरावा सुरू होता. दरम्यान, एमटीडीसीमार्फत महापालिकेला पत्र पाठविण्यात आले असून, दोन कोटी 82 लाख कोणत्या खात्यावर जमा करायचे, अशी विचारणा महापालिकेला करण्यात आली आहे.

रोझ गार्डनसाठी 87 लाखांची गरज

रोझ गार्डनच्या लोकार्पणाची तयारी पदाधिकाऱ्यांनी सुरू केली असली तरी या ठिकाणी अद्याप 87 लाखांची कामे शिल्लक आहेत. केंद्राकडून निधी मिळणार असल्यामुळे उर्वरित कामे मार्गी लागणार आहेत.

असा आहे निधी

एकूण मंजूर निधी – 8 कोटी 33 लाख 64 हजार
जिल्हाधिकारी कार्यालयाला वितरित केलेला निधी – 5 कोटी 50 लाख 73 हजार
जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या उपयोगिता प्रमाणपत्राचा निधी – 5 कोटी 50 लाख 73 हजार
महापालिकेने मागणी केलेला निधी – 2 कोटी 82 लाख 51 हजार

महत्वाच्या बातम्या